उरण येथे उभारणार 1 हजार मेगा वॅट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती प्रकल्प

By Raigad Times    23-Oct-2020
Total Views |

Dr. Nitin Raut_1 &nb
 
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
 
उरण : मुंबईतील वीज पुरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान एक हजार मेगा वॅट क्षमतेचे वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षात उभे करण्याच्या सूचना ना. राऊत यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
 
राऊत यांनी आज उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. या वेळेस त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली.
"मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगा वाट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगा वॅट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगा वॅट वीजनिर्मिती होते. 12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने आणि मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान 1 हजार ते 2 हजार मेगा वॅटचा वीज प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा पक्रल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असे डॉ.राऊत यांनी सांगितले.
 
सध्या या वीज केंद्रातून प्रतियुनिट सुमारे १.७६ रु. इतक्या रास्त दरात वीज उपलब्ध होते. राज्याच्या वीजनिर्मिती क्षेत्रात गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या उरण वायु विद्युत केंद्रास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रथमच भेट देऊन महानिर्मितीच्या राज्यातील कार्यरत या एकमेव वायूविद्युत केंद्राची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी वीज केंद्रातील जनरेटर, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रूम), ट्रान्सफॉर्मर्स इ. यंत्रांची पाहणी करून सविस्तर चर्चाही केले.
 
याप्रसंगी उरण वीज केंद्राची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून वीजकेंद्र प्रमुख पंकज नागदेवते यांनी अवगत करून दिली. याप्रसंगी ऊर्जामंत्री यांनी वीज केंद्रातील विविध तांत्रिकी समस्या जाणून घेतल्या.या वीज केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व त्यायोगे येथून सध्या किमान ७०० मेगा वॅट वीज निर्मिती साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचा तौलनिक अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ही क्षमतावाढ साध्य करण्यासाठी निधीची उभारणी व तंत्रज्ञान याचा तुलनात्मक अभ्यास त्वरित करून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
"गेल कंपनीतून करार केल्याप्रमाणे वायू मिळत नसल्याने स्थापित क्षमतेनुसार वीज निर्मिती करता येत नाही. आम्हाला खुल्या बाजारातून गॅस घेण्याची अनुमती द्यावी आणि आमची वीज जर महावितरणला नको असेल तर खुल्या बाजारात ती विकण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती उरण वीज निर्मिती केंद्राचे प्रमुख पंकज नागदेवते यांनी केली. त्याला मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तत्त्वत सहमती दर्शवत या आशयाचा प्रस्ताव राज्य वीज मंडळासमोर सादर करा, अशा सूचना मंत्री डॉ.राऊत यांनी दिल्या.
 
येथील जुनाट संच, फिल्टर हाऊस च्या समस्या,इंधनवायूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीज निर्मितीला असलेल्या मर्यादा,येथे वीजकेंद्रातच इंधनवायूचा साठा करण्याची निकड,आय लँडिंग यंत्रणेतील संभाव्य सुधारणा,ऑनलाईन फिल्टर बदली करणेची सुविधा,सध्याच्या गॅस पाईप लाईन ची काटेकोर तपासणी इत्यादी बाबीवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मुख्यतः संशोधनात्मक सुधारणा(R and D)च्या माध्यमातून वायूविद्युत क्षेत्रातील जागतिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सध्यापेक्षाही अधिक किफायतशीर दरात स्वच्छ- हरित अशी पूर्णतः प्रदूषणरहित वीजनिर्मिती येथून व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उरण येथे पुरेशी जमीन,पाणी व अन्य संसाधने उपलब्ध असल्याने आगामी काळात आणखी इंधनवायू उपलब्ध करण्यासाठी संबंधित यंत्रणाशी संपर्क साधून सर्वतोपरी प्रयत्न केल्यास येथून खात्रीशीर वीज तात्काळ उपलब्ध होऊ शकते.या केंद्रातील वीजदर राज्यात सर्वात कमी असल्याने येथील वाढीव विजेतून एकूणच राज्यातील ग्राहकांचे हित साध्य होऊ शकते.
 
या दौऱ्याप्रसंगी प्रामुख्याने महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, प्रभारी संचालक (संचलन) राजू बुरडे, कार्यकारी संचालक(संचलन) अभय हरणे, कार्यकारी संचालक(प्रकल्प) संजय मारुडकर, उरण वीज केंद्राचे प्रमुख पंकज नागदेवते, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते