मुरुड : विहूर धरणातून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा

By Raigad Times    23-Oct-2020
Total Views |
Vihur dam_1  H
  • चार ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
  • जिल्हा परिषद अध्यक्षांची घेणार भेट
सुधीर नाझरे/मुरुड-जंजिरा । मुरुड तालुक्यातील विहूर धरणातून मजगाव, उसरोली, नांदगाव व विहूर अशा चार ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सुमारे 25 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येला या धरणातून पाणी पुरवठा होत असतो. एकमेव व अतिशय महत्वाचे असे धरण आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त व पिवळसर, दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
 
दूषित पाणी पुरवठा होत असल्याबाबतच्या तक्रारी संबंधित ग्रामपंचायतींकडे नोंदवल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेत येथील सरपंच व उपसरपंच यांनी तातडीने मजगाव ग्रामपंचायत कार्यालयात चारही ग्रामपंचायतींमधील प्रमुख ग्रामस्थांची सभा बोलावली होती. या सभेला उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, मजगाव सरपंच पवित्रा चोगले, उपसरपंच प्रीतम पाटील, नांदगाव उपसरपंच अस्लम हलडे, विहूर ग्रामपंचायतीचे रमेश दिवेकर, अमित कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या सभेत उपसरपंच प्रितम पाटील यांनी सांगितले की, विहूर धरणातून मुख्य पुरवठा करणारी वाहिनी लोखंडी टाकण्यात आली आहे. याशिवाय ज्या पाईप लाईनमधून धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो तिथे कचरा अडकू नये, यासाठी जाळी बसविणे आवश्यक होते. परंतु असे न केल्यामुळे पाईपलाईनमध्ये कचरा अडकून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दोन वॉश आऊट घेऊनसुद्धा पाणी तसेच येत आहे. या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून रायगड जिल्हा परिषदेने आम्हाला तातडीची मदत करावी, असे ते यावेळी म्हणाले.
 
उसरोली सरपंच मनिष नांदगावकर यांनी सांगितले की, सध्या ग्रामपंचायती साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल. टाकून पाणीपुरवठा करीत आहेत; परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तरी जिल्हा परिषदेने जीवनावश्यक बाब म्हणून आम्हाला तातडीने सहकार्य करावे, यासाठी मंगळवारी (27 ऑक्टोबर) जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांची भेट घेऊन विनंती करु या, असे सर्वांनुमते ठरविण्यात आले आहे.
 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी यांनी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने आम्हाला तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.