- कोरोना मुक्त झाल्यानंतर आई झाली भावूक
- माझ्या लेकाने डॉक्टर होऊन आयुष्याचे सार्थक केल्याची दिली प्रतिक्रीया
अमित गायकवाड/पाली-वाघोशी । सुधागड तालुक्यातील वावळोली कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. नंदकुमार मुळे यांच्या 71 वर्षीय आईला कोरोनाची लागण झाली होती. मात्र तरीही न डगमगता व आपल्या कर्तव्यापासून कसूर न करता डॉ. मुळे यांनी इतर कोरोना रुग्णांप्रमाणेच आपल्या आईची उत्तम सुश्रृषा केली आणि आईला बरे केले. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) सायंकाळी वावळोली कोविड केअर सेंटरमधून बर्या होऊन बाहेर पडणार्या त्या अखेरच्या रुग्ण होत्या. माझ्या लेकराने डॉक्टर होऊन आयुष्याचे सार्थक केले, असे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना उपचार करत असतानाच उस्मानाबादवरुन आईला ताप आला असल्याचा फोन डॉ.मुळे यांना आला. तेथे कोरोनाची टेस्ट केली आणि आईची चाचणी कोरोना पॉझिटीव्ह आली. बीपी लो होता, ऑक्सिजन पातळी खालावलेली. अशा परिस्थितीत आईकडे गेलो तर इथल्या रुग्णांचे काय होणार? हा प्रश्न डॉ. मुळे यांना पडला; मग क्षणाचाही विलंब करता आईलाच आपल्या येथे कोविड सेंटरला आणले. इतर रुग्णांबरोबरच आईची सेवा करुन तिला बरे केले. काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार दिलीप रायन्नावार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे डॉ. मुळे व त्यांच्या आईचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. आईची प्रचंड इच्छाशक्ती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांची व सहकार्यांची अमूल्य साथ यामुळे हे शक्य झाले, असे डॉ. नंदकुमार मुळे यावेळी म्हणाले. तर खूप गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन माझा मुलगा डॉक्टर झाला. आपल्या जबाबदारी व कर्तव्यापासून जराही कसूर न करता तो काम करत आहे. माझ्या लेकाने डॉक्टर होऊन आयुष्याचे सार्थक केले, अशी प्रतिक्रीया डॉ.मुळे यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली.
“मागील 7 महिन्यांपासून तालुका आरोग्य विभाग अविरतपणे खूप कष्ट व मेहनत घेत आहे. त्यांचे काम उल्लेखनीय आहे. डॉ. शशिकांत मढवी व डॉ. नंदकुमार मुळे आणि त्यांच्या स्टाफच्या कामाला सलाम.- दिलीप रायन्नावार,तहसीलदार, पाली-सुधागड”