रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
Roha_Dhavir Maharaj_1&nbs
  • ब्रिटिश काळापासून पोलीस मानवंदना देण्याची परंपरा !
  • कोरोना नियमांचे पालन करत महाराजांच्या नवरात्रौत्सवास सुरुवात
 मिलिंद अष्टिवकर / रोहा : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलीस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासून सुरू आहे, त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज आज मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले. कोरोना नियमांचे पालन करीत अतिशय कमी भक्तगणांच्या उपस्थितीत महाराजांच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.
 
Roha_Dhavir Maharaj_1&nbs
 
शहराच्या पश्चिम बाजूला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या या भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तिनवीरा यांचे स्थान आहे व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे.
 
यावर्षी कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने महाराजांचा नवरात्रौत्सव साजरा होत आहे. दिलेल्या वेळेनुसार काही ठराविक पदाधिकारी यांनीच मंदिरात उपस्थित रहावे, असे पूर्वनियोजन करण्यात आले. रोहेकरांनीही त्यास प्रतिसाद देत दिलेल्या सूचनांचे पालन करीत मंदिरात जाण्याचे टाळले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव विधीवत प्रारंभ झाले.

"हे धाविर महाराजा समस्त रोहावासिय ग्रामस्थांनी श्रध्देने आणी पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रौत्सव मांडला आहे. या उत्सवामध्ये आमच्या हातून चांगली सेवा होईल . काही चुकासुध्दा होतील; पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे, तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव" असे देवस्थानचे पुजारी वरणकर यांनी श्री धाविर देवस्थानचे काही विश्वस्थ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवाकडे गाऱ्हाणे मांडले आणि अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास प्रारंभ झाला.

यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोलाटकर, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे आदींसह उत्सव समितीचे काही मोजके पदाधिकारी उपास्थित होते.
“यंदा अतिशय सध्या पद्धतीने उत्सव होत असला तरी या उत्सवानिमित्त मंदिराचा परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते.. तर सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले.”

🔺 यंदा मंदिरात जाण्यास प्रतिबंध असला तरी श्री धाविर महाराजांचा नवरात्रोत्सव विधिवत व भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होणार आहे. दर रात्री शहरातील प्रत्येक आळीला प्रहर जागवीण्याचा बहूमान असतो. यंदा केवळ काही लोकांनाच प्रहराचे जागरण करता येणार आहे. तर मंदिरात प्रवेश द्वार, रांगोळी व फुलांची केलेली आरास आकर्षक अशी करण्यात आली आहे.
 
Roha_Dhavir Maharaj_1&nbs
 
🔺 या उत्सवाची सांगता दसाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रायगड पोलिसांच्या मानवंदनेनंतर निघणाऱ्या महाराजांच्या पालखी सोहळ्याने संपन्न होत असते. यंदा केवळ महाराजांची बंधू भेट असणार असून त्यासाठी पदाधिकारी व जाणकार मंडळी नियोजन करीत आहे. तर पालखी उत्सवास शासनाची परवानगी मिळावी यासाठी आ. अनिकेत तटकरे हे प्रयत्नशील आहेत.

🔺 शासकीय नियमानुसार भक्तगणांना मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य होणार नसले तरी मंदिर ट्रस्ट व उत्सव समितीने भक्तांच्या भावना व श्रध्देचा विचार करीत फेसबुकलाइव्ह ची व्यवस्था केली आहे. तरी त्यानुसार श्री धावीर महाराजांची सकाळी ७ ची, संध्याकाळी ७ ची आणि रात्री १२ च्या आरतीचे "श्री धाविर महाराज की जय" आणि "व्ही लव रोहा" या पेजवर वर लाइव्ह थेट प्रक्षेपण होणार आहे.