सुधागड : अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचार्‍याचा मृत्यू

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
Accident_1  H x 
  • पाली-खोपोली मार्गावरील घटना
  • अज्ञात वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धम्मशील सावंत/पाली-बेणसे । पाली-खोपोली राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. याच मार्गावर काल (16 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा हेदवली गावच्या हद्दीत टॉपवर्थ कंपनीजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला.
 
सोमा गौरु वाघमारे (वय 58, रा.दहिगाव खालची आदिवासीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रोहिदास वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमा वाघमारे हे पाली-खोपोली मार्गावरुन कानसळ बाजूकडून जांभूळपाडा बाजूकडे पायी चालत जात होते. ते हेदवली गावच्या हद्दीतील टॉपवर्थ कंपनीजवळील वळणावर आले असता, अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरुन वाहनचालक फरार झाला.
 
या अपघातात डोक्याला व इतर ठिकाणी लहान मोठ्या जखमा झाल्याने अपघातग्रस्त सोमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्यबधासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास एएसआय एफ.बी. तडवी करीत आहेत.
 
दरम्यान, नागरिकांनी पायी चालत जाताना पुरेपूर खबरदारी घ्यावी. तसेच वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात टाळावे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.