रायगड जिल्ह्यात खासदार तटकरे यांचे अवकाळस्य प्रथम दिवसे... विरहगीत

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
tatkare and jayant patil_
 
शेकापच्या जयंत पाटलांच्या मौनमैत्रीला पुन्हा चुचकारले!
का रे धरीला मजवरी राग....
 
सध्या रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍याला झोडपलेले असताना जिल्ह्यातील दोन राजकीय पक्षांचं विरहनाट्य कालिदासाच्या मेघदूताप्रमाणे पुढं येत आहे. अवकाळी पडणारा हा पाऊस खासदार तटकरेंना आषाढ महिन्यासारखा भासत आहे की काय? असं आता वाटू लागलंय. गेले अनेक महिने शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी तटकरेंच्या चुचकारण्याला प्रतिसाद दिला नसल्याने "का रे दुरावा...." नंतर "आज का रे धरीला मजवरी राग...." असा संदेश मेघदूतरुपी पत्रकारांकडे सोपवून तटकरेंनी हा विरह आता पत्रकारांनीच संपवावा, असा संकेत दिला आहे. त्यामुळे आता रायगडात दोन राजकीय पक्षांच्या विरहनाट्यात पत्रकारांना मेघदूताची भूमिका निभवावी लागेल, यात शंका नाही.
 
खोपोलीच्या एका कार्यक्रमात तटकरेंशी शेकाप नेते जयंत पाटील यांनी बाळगलेल्या मौनमैत्रीवर पत्रकारांनी विचारल्यावर तटकरेंनी "...का रे दुरावा.....! " या तीन शब्दात प्रतिक्रीया दिली. यातून या दोन नेत्यांतील विरह अगदी स्पष्ट झाला होता. कालिदासाने मेघदूतामध्ये यक्ष व यक्षिणीच्या विरहाचं अप्रतिम वर्णन आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आकाशात आलेल्या मेघाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण खासदार तटकरे यांनी अवकाळी पडणार्‍या पावसाच्या पार्श्वभूमीवर आपला विरह पत्रकारांपुढे दुसर्‍यांदा व्यक्त करताना "...का रे धरीला मजवरी राग...!"असं म्हणत शेकापच्या जयंत पाटलांना तटकरेंनी पुन्हा चुचकारलं आहे.
 
खासदार तटकरे आणि जयंत पाटील यांच्या प्रेमनाट्यापूर्वीचं वैरनाट्य या जिल्ह्यासह महाराष्ट्राने पाहिलं आहे. खासदार तटकरे हे खरं तक्ष कुणाशीही वैर पत्करत नाहीत. ते कायम समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असतात. एक कसलेला राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याशी कायम वैर पत्करलेल्या अनेक राजकारण्यांसोबत समोरच्याची इच्छा नसतानाही स्वत: भेटून कटूता दूर करण्याचा त्यांनी अनेकवेळा यशस्वी प्रयत्न केला आहे. सुदैवाने या राजनितीत त्यांना वेळोवेळी बेरजेच्या राजकारणाचा फायदाच झाला. यात समोरच्याचं किती नुकसान होईल? हे राजकारणात पाहिलं जात नाही. किंबहुना समोरच्याचं नुकसान होईल, हेच फलित असतं. ही एक राजकीय चाल असते आणि यात खासदार तटकरे भाग्यवान ठरले आहेत.
 
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी तटकरेंच्या खासदारकीच्या निवणुकीत तटकरेंना साथ दिली ती केवळ शिवसेनेच्या अनंत गीतेंना शह देण्यासाठी. जयंत पाटील व अनंत गीते यांचे वैर तटकरेंच्या पथ्यावरच पडले; पण ही दोस्ती विधानसभेत शेकापला किती फायद्याची ठरली ? हे शल्य जयंत पाटील कसे विसरतील ! जयंत पाटलांचे शिवसेनेशी निर्माण झालेले वैर इतक्या टोकाला गेलेले असताना राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाल्यावर तटकरेंच्या पारड्यात यश वाढत होतं. तर शेकापच्या पारड्यात चिटुकभर यशही पडत नसल्याने त्यांनी तटकरेंशी संवाद टाळला असावा हे सर्वसामान्यही ओळखू शकतात.
 
...पण या विरहनाट्याला खुमासदार विनोदाची किनार जोडत खासदार तटकरेंनी जिल्ह्यात एका वेगळ्याच चर्चेला निमित्त केलं आहे. "...का रे धरीला मजवरी राग" असा वेगळाच राग आळवून तटकरेंनी जयंत पाटील यांच लक्ष खेचण्याचा प्रयत्न केला आहे. आता मेघदूतातील अलकानगरीत बसलेल्या यक्षिणीकडे रामगिरीवरील यक्षाने पाठवलेल्या मेघरुपी दुताची भूमिका रायगडातील पत्रकारांनी घेऊन जयंत पाटलांपर्यंत पोहचलं पाहिजे आणि या राजकीय यक्ष व यक्षिणीमधील दुरावा आणि धरलेला राग काढून "ही दोस्ती तुटायची नाय..." असा गर्भित संदेश मेघदूतरुपी पत्रकारांनी तटकरेंपर्यंत पोहचवावा, असाच निशाणा तटकरेंनी या दोन विरहगीतातून व्यक्त केला असावा.
 
तूर्तास शेतकरी कामगार पक्षाला तटकरेंची ही दोस्ती तुटावी, असं कधीच वाटणार नाही; कारण राष्ट्रवादी हा शेकापचा शेवटचा मित्र आहे. यातील कटुता शेकापला कदापीही परवडणारी नाही. त्यापेक्षा मौन बरे! हे राजकारण कोळून प्यायलेले जयंत पाटील जाणून आहेत. खासदार तटकरे मात्र बिनधास्त आहेत; कारण तशीही त्यांना शिवसेनेच्या रुपाने एक नवा व राज्यात आणि जिल्ह्यात सक्षम मित्र मिळाला आहे. बेरजेच्या राजकारणात तटकरे कायम यशस्वी ठरतात; कारण त्यांच्या फ्लेक्झीबिलिटीमुळे. ताठरता त्यांच्या स्वभावात नाही. सध्या तटकरेंकडे शेकाप ही गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजवायची... नाहीतर मोडून खायची. म्हणूनच तटकरे निवांतपणे विरहगीतांची एकेक पुडी सोडत आहेत.
 
आता यात तटकरेंनी टाकलेला बॉल शेकापचे जयंत पाटील कोणत्या गीतातून परतवून लावतात की लाल सलाम करतात? त्यावरुन प्रत्येकाची राजकीय हुशारी कळणार आहे. तूर्तास अवकाळस्य प्रथम दिवसे...! तटकरेंना सुचलेलं विरहगीत केवळ करमणूक नाही एवढं मात्र खरं!
 
                  - दीपक शिंदे, पत्रकार, महाड, 9422494989