बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल - गृहमंत्री

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
 
anil deshmukh_1 &nbs
 
जळगाव : बोरखेडा, ता. रावेर येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पिडीतांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
 
बोरखेडा, ता.रावेर येथे चार बालकांची निघ्रृण हत्या झाली त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पिडीत कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री सर्वश्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, प्रातांधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देउगुणे, अ‍ॅड.रविंद्र पाटील, अभिषेक पाटील, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.
 
यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहे काही संशियतांना ताब्यात ही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पिडीतांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिली.