रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अलिबाग । रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर साठलेल्या पाण्याच्या प्रत्यक्ष संपर्कातून लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे तशी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेल्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्रामध्ये अचानक वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. शेती, रस्ते पाण्याखाली आहे. या साठलेल्या पाण्याच्या प्रत्यक्ष संपर्कातून लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादूर्भाव होण्याचा संभव आहे. लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे ताप, थंडी, डोकेदुखी, कावीळ, लाल डोळे, स्नायूंचे दुखणे, पुरळ, अडकलेली मान, अतिसार साधारणत: ही लक्षणे आढळून येतात.
त्यामुळे ही लक्षणे दिसून येत असलेल्या नागरिकांनी दुर्लक्ष न करता तात्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.