सिडकोला शेतकर्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
घनश्याम कडू/उरण । जासई येथील शेतकर्यांनी सिडकोविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ‘आधी मागण्या पूर्ण करा, तरच भूमी संपादन करा’ असा नारा दिला आहे.
जासई गावच्या 270 शेतकर्यांना सिडकोकडून भूसंपादनाच्या नोटीसा आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ सर्व शेतकर्यांनी आज (14 ऑक्टोबर) सकाळी 11.30 वाजता उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अश्विनी पाटील यांच्या कार्यालयात भेट घेऊन शेतकर्यांवर होणार्या अन्यायाविरुद्ध प्रश्न उपस्थित केले. याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली 270 शेतकरी, माजी सभापती नरेश घरत, यशवंत घरत, धर्माशेठ पाटील, सरपंच संतोष घरत, संजय ठाकूर, धर्मदास घरत, निलेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वीचे प्रश्न, 22 टक्के भूखंडाची अजून पूर्तता झालेली नाही, एमटीएचएल करारानुसार नागरी सुविधांची पूर्तता झालेली नाही, गावातील राहत्या घरांचा प्रश्न, 135 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले त्यांना प्रश्न, विस्तारित गावठाणाचा प्रश्न सुटलेला नाही, याकडे लक्ष वेधत हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय भूसंपादन करु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.