अलिबाग येथील सरकारी मेडीकल कॉलेजबाबत सरकारचे मोठे पाऊल

By Raigad Times    14-Oct-2020
Total Views |

alibag civil hospotal_1&n
जागा निश्चित झाली,आता कॉलेजसाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास मिळाली परवानगी
 
अलिबाग : अलिबाग येथील सरकारी मेडीकल कॉलेजच्या दिशेने राज्य सरकारची वाटचाल सुरु असून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय आणि रुग्णालयातील रुग्ण खाटांचा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचा वापर करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अलिबागसह सातारा आणि नंदुरबार येथे मेडीकल कॉलेज होणार आहेत.
 
सन 2012 मध्ये तत्कालीन वित्त मंत्री सुनिल तटकरे यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात होऊ शकले नाही. प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज व्हावे, याबाबतची घोषणा केंद्र सरकारने केली. यानंतर खासदार सुनिल तटकरे यांची पुन्हा लगबग सुरु झाली.
 
केंद्र सरकारने राज्यांकडून प्रस्ताव मागण्यास सुरुवात केली आणि पालकमंत्री आदिती तटकरे वडिलांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सज्ज झाल्या. सातारा आणि नंदुरबारसोबत अलिबाग येथील मेडीकल कॉलेज व्हावे, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे लक्ष ठेवून होत्या. शेवटी सोमवारी (13 ऑक्टोंबर) अलिबाग येथील नियोजिक मेडीकल कॉलेजसाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास शासन मान्यता दिली आहे.
 
अलिबाग येथे होणारे मेडीकल कॉलेज हे रायगडच नव्हे तर कोकणातील पहिले सरकारी मेडीकल ठरणार आहे. कॉलेज व संलग्नित रूग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून या जागेची मोजणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉ.गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून निुयक्तीही करण्यात आली आहे.