शेतीचे काम करीत असताना विंचूने केला दंश
म्हसळा । तालुक्यातील मेंदडी येथे भाताची मळणी करीत असताना विंचूने दंश केल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मनिष गोवर्धन पयेर (वय 16, मूळ राहणार-खरसई) असे मृत मुलाचे नव आहे.
मनिष मंगळवारी (13 ऑक्टोबर) त्याचे आजोबा शांताराम भगत यांच्या मळणीवर भारे झोडत होता. काम करीत असताना त्याच्या उजव्या पायाच्या बोटांच्या मध्ये काळ्या रंगाच्या विषारी इंगळीने जोरदार दंश केला. भरल्या उन्हात काही वेळातच मनिषला घाम येऊ लागल्याने त्याला तात्काळ नजीकच्या मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मनिष उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला पुढील उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मनिषचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मेहता यांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. दरम्यान, अकरावीत शिकत असलेल्या मनिष पयेर याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.