राहुल तेवतीया; भावी युवराज सिंग

By Raigad Times    12-Oct-2020
Total Views |
 rahul tewatiya_1 &nb
 
आयपीएल चषक स्पर्धेत रविवारी राजस्थान विरुद्ध हैद्राबाद हा सामना खेळला गेला. संपूर्ण सामन्यात हैद्राबादचेच वर्चस्व होते. हैद्राबाद हा सामना सहज जिंकणार अशीच चिन्हे दिसत असताना राहुल तेवतीया हा राजस्थान रॉयलचा युवा फलंदाज मैदानात उतरला आणि बघता बघता सामन्याचे चित्र पालटले. जो सामना हैद्राबाद सहज जिंकेल असे वाटत होते तो सामना राहुल तेवतीयाने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने राजस्थान रॉयलला जिंकून दिला.
 
राजस्थानला शेवटच्या तीन षटकात ३६ धावा होत्या समोर राशीद खान हा विश्वस्तरीय फिरकी गोलंदाज होता. राशीद खानने याआधी आपल्या संघाला अशा परिस्थितून अनेक विजय मिळवून दिले आहेत यावेळीही तो बळी मिळवून हैद्राबादला विजय मिळवून देईल असे वाटत असताना राहुल तेवतीयाने त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि आपल्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. याआधीही त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात असाच धडाकेबाज खेळ करुन राजस्थान रॉयलला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यातील १८ व्या षटकात शेल्डन कौट्रेल या वेस्ट इंडियन वेगवान गोलंदाजाला त्याने सलग पाच षटकार मारून धमाका केला होता. तेंव्हा त्याची ती खेळी पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले होते. त्याखेळीत त्याने काही विक्रमही केले होते.
 
आयपीएलमध्ये एकही चौकार न लगावता सर्व षटकार मारणारा तो राणा आणि सॅमसन नंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला तसेच एकाच षटकात सलग पाच षटकार ठोकून त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली होती. रविवारी त्याने त्या खेळीची पुनरावृत्ती करुन आपण लंबे रेस का घोडा आहोत हे सिद्ध केले आहे. राहुल हरियाणा मधील फरीदाबाद जिल्ह्यातील सीही या छोट्याशा गावातून आला आहे. याच गावात त्याने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले आहेत. त्याचे वडील वकील आहेत. आपल्या मुलाने क्रिकेटमध्ये करियर करावे आणि देशासाठी खेळावे अशी त्यांची इच्छा होती. राहुल ज्याप्रकारे खेळत आहे ते पाहता तो आपल्या वडिलांची ही इच्छा लवकरच पूर्ण करेल असे वाटते.
 
राहुलने २०१३ साली प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१४ साली तो राजस्थान तर्फे आयपीएलमध्ये प्रथम खेळला. पण या मोसमात त्याला केवळ तीन सामने खेळायला मिळाले. त्यानंतर २०१७ साली त्याला पंजाबने करारबद्ध केले. तेंव्हा देखील तो ३ सामने खेळला. २०१८ मध्ये दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले. तेंव्हा मात्र त्याला सर्वाधिक ८ सामने खेळायला मिळाले. गतवर्षी पुन्हा राजस्थान रॉयलने त्याला आपल्या संघात स्थान दिले. गतवर्षी तो विशेष काही करू शकला नाही मात्र यावर्षी त्याने कमाल केली. पंजाब विरुद्धच्या तुफानी खेळीने तो रातोरात प्रसिध्दीच्या झोतात आला. तो सध्या आपल्या आपल्या फलंदाजीने कमाल करीत असला तरी तो मूळचा फिरकी गोलंदाज आहे.
 
डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणे ही त्याची खासियत तसेच तो चांगला क्षेत्ररक्षकही आहे म्हणजेच तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. भारतासाठी जी भूमिका युवराज सिंग निभवायचा तीच भूमिका राजस्थानसाठी राहुल निभावत आहे म्हणूनच त्याला भारताचा भावी युवराज सिंग असे संबोधले जात आहे. युवराज सिंगही त्याचा मोठा फॅन आहे. जर तो अशीच फटकेबाजी करीत राहिला तर लवकरच तो भारतीय संघात खेळताना दिसेल. युवराज सिंग निवृत्त झाल्यापासून भारतालाही त्याच्या तोडीचा फलंदाज मिळाला नाही. जर तो असाच खेळत राहिला तर भविष्यात तो नक्कीच युवराज सिंगची जागा घेऊ शकतो.
 
- श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५