माथेरानची मिनीबस झाली बारा वर्षांची

By Raigad Times    12-Oct-2020
Total Views |
 matheran mimi train_1&nbs
 
माथेरान/ मुकुंद रांजाणे : माथेरान करांचे चार दशकांपासूनचे असलेले कर्जत ते माथेरान दरम्यान मिनीबस सेवा सुरू व्हावी हे दिवास्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी खूपच मोठा कालावधी लागला. हे अशक्यप्राय स्वप्न साक्षात आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले होते.११ ऑक्टोबर २०११ रोजी कर्जत माथेरान मिनीबस सेवा सुरू झाल्यामुळे या अनेकांना याचा लाभ घेता येत आहे. या सेवेला दि.११ रोजी एक तप पूर्ण झाले असल्याने सर्वांच्या लाडक्या मिनीबसचा वाढदिवस खेडकर यांच्या निवासस्थानी मोठया आनंदाने साजरा करण्यात आला.  यावेळी नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, माथेरान नागरी सहकारी पतसंस्था सभापती हेमंत पवार, मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते बिलाल महापुळे, उद्योजक भास्करराव शिंदे, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांसह अन्य उपस्थित होते.
 
११ऑक्टोबर २००८ रोजी माथेरान - कर्जत बससेवेचे उदघाटन मनोज खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले आज त्या गोष्टीला १२ वर्षे म्हणजे एक तप पुर्ण होत आहे. माथेरानकरांचा माथेरान - नेरळ प्रवास सन्मानजनक व स्वस्तात व्हावा, हे खेडकर यांचे काॅलेजला असताना पासुनचे स्वप्न होते. ३१ डिसेंबर २००६ या दिवशी त्यांनी माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली आणि माथेरानकरांना बससेवा चालु करण्यासाठी दिलेला शब्द पुर्ण करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आली. तेव्हापासुन त्यांनी प्रशासनाकडे २१ महीने सातत्याने पाठपुरावा केला. बसच्या अनेक चाचण्या घाटात घेतल्या. प्रत्येक वेळी नविन समस्या व रस्त्याचे नविन काम अथवा दुरुस्त्या सुचवल्या जायच्या. त्यांच्या प्रत्येक अडचणींचे निराकरण करायचे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून एस.टी. महामंडळाने सुचवलेली कामे करुन घ्यायची. त्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याकरीता पाठपुरावा सुचवलेली कामे झाली की पुन्हा एस.टी. बसची घाटात चाचणी. चाचणीसाठी आवश्यक मिडीबस उपलब्ध करुन देणे. त्याकरीता एस.टी. महामंडळाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठका/चर्चा, असे चक्र बससेवा सुरु होई तोपर्यंत सातत्याने चालु होते.
 
बसच्या चाचणीसाठी खेडकर व त्यांचे काही मोजके सहकारी उपस्थित असायचे. बससेवा हा विषय अत्यंत नाजुक व संवेदनशील होता. त्यामुळे फार जबाबदारीने व संयमाने या चाचण्या घेतल्या गेल्या. घाट रस्त्याची आवश्यक कामे केली. कुठेही कार्यकर्ते उन्माद करणार नाहीत व होणारे काम बिघडणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागत होती. कारण छोट्याशा ठिणगीने देखील परिस्थिती गंभीर होऊ शकते याची त्यांना जाणीव होती. मिनीबससेवा हा माथेरानकरांसाठी 'भावनिक' विषय होता. १९७४ साली देशात रेल्वेचा संप झाला तेव्हा माथेरानकरांनी 'श्रमदानातुन' नेरळ माथेरान घाटरस्ता गाड्या चढु शकतील अशाप्रकारे निर्माण केला होता. तेव्हापासुन माथेरानचे नागरीक एस.टी. बससेवा सुरु व्हावी याची वाट पाहत होते. ३४ वर्षांनंर त्याची प्रतिक्षा संपण्याची आशा पल्लवीत झाली होती.
 
दोन मिडीबस कर्जत आगारात दाखल झाल्या. आणि अखेर ९ ऑक्टोबर २००८ विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर एस.टी. बससेवेचा शुभारंभ ठरला. आदल्या दिवशी ८ ऑक्टोबर २००८ रोजी जिल्हाधिकारी मा. निपुण विनायक यांनी अलिबागला बैठक लावली होती. या बैठकीत तत्कालीन पोलीस अधिक्षक यांनी पोलीस बंदोबस्त देण्यास नकार दिला व कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव सुरक्षेची हमी नाकारली. दसर्‍याच्या दिवशीचे उदघाटन रद्द करावे लागले. बैठकीला उपस्थित माथेरानकरांची घोर निराशा झाली. काही जणांना अश्रु आवरता आले नाहीत. हा संदेश लगेच गावात गेला. समस्त वातावरणात नैराश्य पसरले होते. 'आता कधीच बससेवा सुरु होत नाही', अशी मत चौकाचौकात व्यक्त होत होती. 'स्वप्नपुर्तता' होणार अस दिसत असताना अचानक 'स्वप्नभंग' वाट्याला आले होते. प्रचंड दु:खी मनाने मनोज खेडकर मुंबईला गेले. इतर सहकार्‍यांंना माथेरानला पाठवुन दिले.
 
पुढील दोन दिवसात त्यांनी अत्यंत सावधपणे गुप्तता ठेवुनसंबंधित अधिकारी वर्गाच्या भेटीगाठी घेतल्या. यामधे त्यांना ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली व पोलीस बंदोबस्त मिळवुन दिला. १० तारखेला जिल्हाधिकार्‍यांबरोबर चर्चा करुन ११ ऑक्टोबरलाच उदघाटनाचा आग्रह धरला. जिल्हाधिकारी मा. श्री. निपुण विनायक यांनी एस. टी. सेवा ११ ऑक्टोबर २००८ रोजी सुरु करण्यास परवानगी दिली. १० तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता खेडकरांनी आशा कदम यांना फोन करुन उद्या सकाळी बससेवेच्या उदघाटनाचा बोर्ड राम चौकात लावण्यास सांगीतले. ही बातमी देखील वार्‍यासारखी गावात पसरली. दुसर्‍या दिवशी सकाळी दस्तुरीला नागरीकांनी अलोट गर्दी केली. त्यावेळी समाजमाध्यम एवढी रुळलेली नव्हती, तरीही सर्वदुर बातमी पसरली. जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
 
या कार्यक्रमाला एस.टी. महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता उपस्थित होते. उदघाटनाचा कार्यक्रम एम.टी.डी.सी.च्या प्रांगणात पार पडला.ही बससेवा सुरु करण्यात एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश गुप्ता व जिल्हाधिकारी मा. निपुण विनायक यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यामुळेच माथेरानकरांचीही स्वप्नपुर्ती होऊ शकली. कारण बससेवेचा हा प्रश्न केवळ रस्ता व रस्त्याची सुरक्षा इथपर्यंत मर्यादित नव्हता. तो कायदा आणि सुव्यवस्थेचा होता, नागरीकांच्या सुरक्षेचा होता. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तिला प्रशासनाच्या इच्छाशक्तिची जोड आवश्यक होती. सर्व धोक्यांचा अंदाज होता तरीही मी बससेवा चालु करण्याबाबत ठाम होतो; तितक्याच तीव्रतेने हे अधिकारी देखील ठाम राहीले. त्यामुळेच नवी कोरी बस जाळल्यानंतरही बससेवा पोलीस बंदोबस्तात चालु ठेवली व ती आजही अविरत चालु आहे.
 
वर्षाताई देशपांडे यांनी सरकारला जाब विचारल्यामुळेच एवढ्या तातडीने पोलीस बंदोबस्त मिळाला आणि बससेवा सुरु झाली हे माथेरानकर कधीही विसरु शकत नाहीत. बससेवेमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता येत आहे. आरोग्यसेवेसाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी कर्जतपर्यंत स्वस्तात प्रवास करता येत आहे. या कामात पोलीस उपअधिक्षक श्री. वायसेपाटील, कर्जत एस.टी. आगार व्यवस्थापक मगदुम, महाव्यवस्थापक बी. एस. बच्छाव, व्ही. गायधनी, कॅ. विनोद रत्नपारखी, रायगड विभाग नियंत्रक जगदीश कदम, विभागीय वाहतुक अधिकारी श्री. जोशी, आर.टी.ओ.श्री. खरमाटे, श्री. संजीव भोर, सा.बां. विभागाचे अभियंता श्री पुजारी, नगरपरिषद मुख्याधिकारी विजय म्हसाळ, जिल्ह्यातील पत्रकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माथेरानकरांनी २००६ च्या निवडणुकीत मनोज खेडकर यांच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच काँग्रेस पक्षाला ही बससेवा चालु करण्यात यश आले. आज या बससेवेस एक तप पुर्ण झाले.
---------------------------------------------------------
  • माथेरान करांसाठी मनोज खेडकर साहेबांनी मिनी बसचे स्वप्नं पाहिले आणि ते पूर्ण करायला झोकून दिले आणि आज १२ वर्ष पूर्ण झाले,या सेवेतून आज माथेरान करांची आपली अनेक कामे,शिक्षण,रोजगार,आरोग्य यासाठी या मिनी बसचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होताना दिसत आहे.खरोखरच मनोज खेडकराना या महत्वपूर्ण मिनीबस सेवेचे जनक,शिल्पकार म्हंटल तर वावग ठरणार नाही.
  •                                                                                                   - हेमंत हनुमंत पवार सभापती, माथेरान नागरी सहकारी पतसंस्था