- दिघी सागरी पोलिसांकडून नवरात्र मंडळांना सूचना
- गरबा, दांडियाला परवानगी नसल्याने गरबाप्रेमी नाराज
अभय पाटील/बोर्लीपंचतन : काही दिवसांवर आलेल्या नवरात्र उत्सवदेखील मागील सणांप्रमाणेच शासनाच्या असलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करीत साधेपणाने साजरा करा. कोणतेही कार्यक्रम न राबविता आरोग्य तपासणी, रक्तदान यासारखे कार्यक्रम राबवा व गर्दी होणार नाही, याची दक्षता बाळगा; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी आज (१२ ऑक्टोबर) पोलीस ठाण्यात आयोजित नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देताना दिला.
नवरात्रौत्सव श्रीवर्धनमध्ये मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे मागील 6 महिने प्रत्येक धर्माचे सगळे महत्वाचे सण प्रत्येक धर्माने साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. शासनाच्या दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचप्रमाणे आता येणारा नवरात्रौत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा करावा, यासाठी सूचना देण्यासाठी आज दिघी सागरी पोलीस ठाणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेस सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार तसेच हद्दीतील विविध नवरात्र मंडळाचे पदाधिकारी यामध्ये सदानंद खेउर, संतोष पाटील, अनंत मेंदाडकर, दत्तात्रेय पांढरकामे, संतोष भायदे, चंद्रकांत बिराडी, लक्ष्मण गुणाजी, शंकर गाणेकर, रमेश कांबळे, गजानन चाळके, सर्व गावांचे पोलीस पाटील तसेच इतरही उपस्थित होते.
यामध्ये सूचना देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार म्हणाले की, वाद्य, मिरवणूक, गरबा, दांडिया यासाठी परवानगी नाही. प्रत्येक मंडळाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावयाचे आहे, ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विसर्जन होणार आहे तिथे ग्रामपंचायतीने विसर्जनाची व्यवस्था करावी. मंडळाने येणाऱ्या भक्तांना मास्क, सॅनिटायजर, सामाजिक अंतराने दर्शन द्यावे व कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. नियमांचे पालन न करता ज्या ठिकाणी गर्दी दिसेल अशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे शेलार यांनी सभेत संगितले.
यावर्षी कोरोनामुळे सर्वच हौसेवर विरजण पडत आहे. या नवरात्रौत्सवामध्ये दांडिया, गरबा यांना शासनाने परवानगी न दिल्याने गरबा व दांडियाप्रेमींचा हिरमोड झाला आहे; पण देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटापुढे आपण या हौसेवर पाणी सोडणार असल्याचे काही दांडियाप्रेमी म्हणाले.