परदेशात नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By Raigad Times    12-Oct-2020
Total Views |
 nallasopara_1   
 
नालासोपारा : विरारला राहणार्‍या एका महिलेला परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यापैकी पाच आरोपींना मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली आहे. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
 
पीडित महिलेची ऑक्टोबर 2019 ते मे 2020 यादरम्यान नालासोपारा पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये आरोपी रुक्साना सलीम सिद्दिकी (60) यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यांनी त्यांचे पती आरोपी सलीम सिद्दिकी (65) हे परदेशात नोकरीस पाठवतात, असे आमिष दाखवून पीडित महिलेकडून 2 लाख रुपये घेतले.
 
नंतर तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून दिल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तीन आरोपींनी तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून ती शुद्धीवर आल्यावर तिच्या घरी पाठवून दिले. तिन्ही आरोपींनी त्यांच्या घरात एकटे असताना पीडित महिलेला बोलावून तिचे अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले.
 
10 दिवसांत परदेशात नोकरीची व्यवस्था होईल असे सांगून दुसर्‍या दोन आरोपींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे पीडितेस सांगण्यात आले. पण पीडित महिलेने यास नकार दिला. तरी तिच्यावर अत्याचार होत राहिले. शेवटी कंटाळून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
 
पोलिसांनी आरोपी सलीम सिद्दिकी (65), अखिल सलीम सिद्दिकी (32), फिरोज सलीम सिद्दिकी (25), विजय बलराम फतीयाल (30), वेनम (25), रु क्साना सलीम सिद्दिकी (60) आणि फरिन सलीम सिद्दिकी (25) या सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.