पनवेल शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाविरोधात जनता आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

By Raigad Times    10-Oct-2020
Total Views |

panvel photo_1  
 
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा परिसरामध्ये तळोजा एमआयडीसी पासून होणार्‍या प्रदूषणामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याविरोधात मागील दोन वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक संघटनाकडून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, अध्यापि येथील प्रदूषणाचा प्रश्न सोडविला गेला नाही. वाढत्या प्रदूषणाला आळा बसविण्यासाठी जनतेने एल्गार पुकारला असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी खारघर येथे एक बैठक घेण्यात आली. ज्या सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या विषयावर काम केलेले आहे, अशा संघटना आणि नागरिकांची निवडक प्रतिनिधी प्रदूषणाबाबत विचारविमर्श करण्यासाठी खारघर येथील उत्कर्ष हॉलमध्ये नुकतीच बैठक झाली.
 
सदर बैठकीत पुढील आंदोलनाविषयी चर्चा झाली. यावेळी महानगरपालिका परिसरातील खारघर कामोठा कळंबोली तळोजा या प्रदूषण बाधित परिसरामधील यापूर्वी प्रदूषण विरोधात काम केलेल्या संघटना आणि नागरिक यांना एकत्र आणणे, यापूर्वी झालेल्या आंदोलना मधील पत्रव्यवहार एकत्र आणणे , प्रदूषण विरोधात काम करण्यासाठी प्रदूषण विरोधी संघर्ष समिती स्थापन करणे , पुढील आंदोलनासाठी संघटनात्मक बांधणी करणे, आंदोलनाची दिशा ठरविणे, नेमके प्रदूषण कशामुळे होते याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून, शक्य असल्यास प्रदूषण निर्मिती करणार्‍या कंपन्यांची यादी तयार करणे आदी ठराव पारित करण्यात आले.
 
यावेळी खारघर फोरम, खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन, घाटी मराठी संस्था कळंबोली, एकता सामाजिक संस्था कामोठे, तळोजा पाचनंद रहिवासी सामाजिक संस्था ,सिटीझन फोरम सेक्टर 10 खारघर इत्यादी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.